‘विठ्ठला शप्पथ’ – Vithhthhala Shappath

‘विठ्ठला शप्पथ’ – Vithhthhala Shappath

Posted by mediaone - in 2017 - Comments Off on ‘विठ्ठला शप्पथ’ – Vithhthhala Shappath

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असं असलं तरीही प्रेक्षक नेहमीच सावळ्या विठुरायावर आधारित असणा-या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेत गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी ‘विठ्ठला शप्पथ’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १५  सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वारीतील ऊर्जा व सकारात्मक भावना हे सगळंच विलक्षण अलौकिक असून भक्तांची देवभेटीची ओढ विलक्षण प्रामाणिक असते. ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. या चित्रपटातून विठ्ठलाच त्याच्या भक्ताशी असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्यात आलं आहे.

एका वडिल आणि मुलाच्या नात्याच्या माध्यमातून ‘विठ्ठला शप्पथ’ ची कथा उलगडते. वडिलांच्या विठ्ठलभक्ती विरोधात असणारा कृष्णा त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे बदलतो का? याची रोमहर्षक कथा या चित्रपटातून पहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे. विठ्ठला शप्पथ या चित्रपटाची कथा, पटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवाद लेखन चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद यांचे आहेत. प्रत्येक देवभक्ताला या चित्रपटाच्या निमित्ताने भक्तीचा अनोखा अनुभव मिळेल असा विश्वास दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.

वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुँवर या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत व पार्श्वसंगीत  दिलं आहे.

मंगेश देसाई, अनुराधा राज्याध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, केतन पवार, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसोबत विजय साईराज, कृतिका गायकवाड ही नवोदित जोडी या चित्रपटात आहे. छायांकन सँडी यांचं असून संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव तर कलादिग्दर्शन वासू पाटील यांच आहे. ‘विठ्ठला शप्पथ’ १५ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

Comments are closed.