मानाचि वर्धापन दिन २०१७

मानाचि वर्धापन दिन २०१७

Posted by mediaone - in Events - Comments Off on मानाचि वर्धापन दिन २०१७

६ मे २०१७ रोजी पु. ल. देशपांडे अकादमी येथे ‘मानाचि’ अर्थात मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. “एक होऊया उत्कर्ष साधूया” हे ब्रीद घेऊन लेखकांच्या सर्वंकष उत्कर्षासाठी स्थापन झालेल्या ह्या संघटनेत आता दोनशेच्या वर लेखक सभासद आहेत आणि अनेक लेखकांचा ओघ वाढतो आहे. ह्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक (‘१००’, ‘सी आय डी’, ‘आहट’ आणि अनेक मालिका) श्री.बी.पी.सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहसा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला न जाणारे श्री. सिंह केवळ लेखकांच्या आदराखातर ह्या कार्यक्रमाला आले आणि तासभर गप्पा मारून अनेक अनुभव सांगितले. ते म्हणाले, “देवा नंतर कोणी असेल तर तो लेखक आहे  आणि मराठी लेखकांना हिंदीत पण खूप मान आहे.

त्यानंतर झालेल्या “समीक्षक आणि आम्ही” ह्या चर्चात्मक कार्यक्रमात सामिक्षाकातर्फे गणेश मतकरी, विजय तापस, अमित भंडारी, ह्यांनी तर लेखकातर्फे पुरुषोत्तम बेर्डे, सचिन गोस्वामी, विजू माने यांनी भाग घेतला होता. सम्यक म्हणून राजू परुळेकर होते. समीक्षा हवी का? ते समीक्षेचा दर्जा या सगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. आणि व्यक्तिगत आवडी-निवडीतून किंवा पुर्वग्रहदुषित होणारी समीक्षा कलेला घातक आहे यावर सगळ्याचं एकमत झालं.

‘मानाचि’ लेखकांसाठी विमा योजना सुरु करत असून त्याचं महत्व श्री.अगस्ती दाबके यांनी विशद केलं. ‘मानाचि’च्या प्रयत्नातून चित्रपटाच्या प्रसिद्धीत लेखक गीतकार ह्यांची नावे अनिवार्य करण्याचा निर्णय अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने घेतला आणि त्याची अंमलबजावणी पण सुरु झाली. सांस्कृतिक मंत्री श्री.विनोद तावडे ह्यांची ‘मानाचि’च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन लेखकाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय चित्रपटाला अनुदान मिळू नये असा कायदा करण्याची विनंती केली. ती श्री.तावडे यांनी त्वरित मान्य करून अंमलबजावणी करण्याच आश्वासन दिलं.

शेवटी ‘मानाचि’च्या लेखकांनी केलेला मनोरंजनाचा कार्यक्रम कोणत्याही व्यावसायिक कार्यक्रमापेक्षा थक्क करणारा होता.

Comments are closed.