हलाल – Halal

हलाल – Halal

Posted by mediaone - in 2017 - Comments Off on हलाल – Halal

मुस्लिम समाजातील महिलांचे स्थान आणि त्यांना मिळालेले अधिकार नेहमीच विवादास्पद राहिले आहेत. त्यातल्याच मुस्लिम समुदायात प्रचलित असलेल्या ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकच्या प्रथेचा मुद्दा सध्या गाजतोय. या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. ही अमानवीय प्रथा  बंद व्हावी यासाठी लढा उभारला जात असतानाच या प्रश्नाचा वेध घेणारा हलाल हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातला आहे. अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत’ हलाल हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे व अमोल कागणे यांनी केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचं आहे.

चित्रपट हे माध्यम समाजातील अपप्रवृत्तींवर भाष्य करण्यासाठी कायमच वापरले गेले आहे. विवाह व तलाक या दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लिम स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नसल्याने याचा परिणाम त्यांच्या भावनांवर कशाप्रकारे होतो याचे परखड चित्रण हलाल मध्ये आहे. लेखक राजन खान यांच्या हलाला कथेवर आधारित या चित्रपटाशी अनेक दिग्गज् मंडळी जोडली गेली आहेत. हलाल च्या माध्यमातून तिहेरी तलाक या अमानवीय प्रथेबद्दल भाष्य करण्यात आलं असून सामाजिक बंधनांखाली स्त्रियांची केली जाणारी घुसमट मांडतानाच प्रेमकथेची सुंदर किनार दिग्दर्शकांनी या चित्रपटाला जोडली आहे. मानवी वेदनेची कथा असणारा हा चित्रपट महिलांच्या दृष्टीकोनातून समाजपरिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव  व अभिनेत्री प्रितम कागणे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असून त्यांच्यासोबत विजय चव्हाण, छाया कदम, संजय सुगावकर अमोल कागणे, विमल म्हात्रे या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. अभिनेता प्रियदर्शन जाधव व चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या आजवरच्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी भूमिका हलाल मध्ये साकरली आहे. अभिनेत्री प्रितम कागणे ह्यांनीसुद्धा आपल्या भूमिकेसाठी मुस्लिम स्त्रियांच्या राहणीमानाचा अभ्यास करत प्रचंड मेहनत घेतली.

चित्रपटाची पटकथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास, संकलन निलेश गावंड यांचं आहे. कार्यकारी निर्माते मिथिलेश सिंग राजपूत आहेत. चित्रपटाची गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदरी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे, सय्यद अख्तर, विजय गटलेवार यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे.

प्रदर्शनाआधीच कान्स फिल्म फेस्टिव्हल, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे फिल्म फेस्टिव्हल, औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हल यांसारख्या अनेक राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटविलेल्या या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. उच्च निर्मितीमूल्य, सशक्त आशय, कलाकारांची जमून आलेली भट्टी या सगळ्यांमुळे हलाल नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकेल. ६ ऑक्टोबरला हलाल प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.