FARZAND -(फर्जंद)

FARZAND -(फर्जंद)

Posted by mediaone - in 2018 - Comments Off on FARZAND -(फर्जंद)

शिवकालीन  पराक्रमाची  गाथा  पुन्हा होणार जिवंत!

 

शिवाजी महाराज आणि शिवकाल हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. परंतु दुर्देवाने शिवकालावर उत्तम चित्रपट निर्मिती आदरणीय भालजी पेंढारकरांनंतर कुणी केल्याचं दिसत नाही. तब्बल ४० वर्षानंतर असा प्रयत्न करत शिवरायांची युद्धनीती, मावळ्याचं शौर्य, आणि त्यांचा रणझुंजारपणा हे सगळं आगामी ‘फर्जंद’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असून सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.

भौगोलिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने पन्हाळा गडाचे महत्त्व, महाराजांचा राज्याभिषेक, पन्हाळा गडाच्या आसपास असलेल्या सामान्य जनतेवरील वाढता अन्याय या सगळ्या गोष्टी महराजांच्या प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या.  या साऱ्या परीस्थितीत पन्हाळा जिंकणे हे महाराजांसाठी अतिशय महत्त्वाचे होते. ‘फर्जंद’ या आपल्या धाडसी वाघावर महाराजांनी ही जबाबदारी सोपवली. ‘आपण फकस्त लडायचं.. आपल्या राजांसाठी… आन् स्वराज्यासाठी’…! असं म्हणत पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा शूर मावळा असलेल्या याच ‘कोंडाजी फर्जंद’ याच्या पराक्रमाची गाथा ‘फर्जंद’ चित्रपटाद्वारे १ जूनला चित्रपटगृहात उलगडणार आहे.

महाराष्ट्राला इतिहासाची उज्ज्वल परंपरा आहे. शिवकालीन मावळ्यांच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोह्चेलेल्या नाहीत. शिवरायांची प्रत्येक मोहीम ही योजनाबद्ध राहिलेली आहे.  ‘फर्जंद’ या चित्रपटातून शिवाजी महाराजांच्या ६० पराक्रमी वीरांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाची गोष्ट उलगडण्यात येणार आहे. या ६० मावळ्यांनी २५०० विजापूरी सैनिकांचा पराभव करून पन्हाळा किल्ला अवघ्या साडेतीन तासात जिंकला. या मोहिमेमागे बहिर्जी नाईक यांच्याप्रमाणे पंत, गणोजी, गुंडोजी, मर्त्या, मोत्याजी मामा हे सगळेजण महिनोमहिने काम करत होते. त्यांनी पुरवलेल्या अचूक माहितीच्या व पराक्रमाच्या जोरावरच एका रात्रीत हा अवाढव्य किल्ला महाराजांनी जिंकला.

मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असून शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर, तर अंकित मोहन या कलाकाराने कोंडाजी फर्जंद साकारला आहे. या व्यतिरिक्त गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, अस्ताद काळे, हरिश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, निखील राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देशपांडे, समीर धर्माधिकारी तसेच ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटात लादेनची भूमिका करणारा प्रद्युमन सिंग या सर्व कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

कथेला पूरक चार श्रवणीय गाणी या चित्रपटात आहेत. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. ‘राखू द्या ना मर्जी स्वारींची’ ही लावणी ज्येष्ठ लोककलाकारांच्या मार्गदर्शनाखाली चित्रित करण्यात आली आहे. ‘आई अंबे जगदंबे तारी संगरात’ हा गोंधळ ही ठेका धरायला लावणारा आहे. तसेच संस्कृत शब्दरचना असलेले कोंडाजी थीम चे गीत ही स्फूर्तीदायक झाले आहे. ‘शिवबा मल्हारी’ हे गीत ही चांगलं जमलं आहे.

‘फर्जंद’ चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड यांनी केले असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक तर रंगभूषा सचिन देठे यांची आहे. अक्षता तिखे यांचे नृत्यदिग्दर्शन आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.

कोंडाजीच्या झुंजीची संघर्षमय विजयी गाथा… राजे शिवाजी महाराजांची धोरणी भूमिका अन् लढवय्या मावळ्यांचे योगदान हे सारं उलगडणारा हा शिवकालीन युद्धपट नवी ऐतिहासिक दृष्टी देणारा ठरेल हे नक्की.

१ जूनला ‘फर्जंद’ प्रदर्शित होणार आहे.

Official Teaser Link-https://www.youtube.com/watch?v=n5tcTFTUDH8

 

Comments are closed.