Ek Nirnay – ( एक निर्णय )

Ek Nirnay – ( एक निर्णय )

Posted by mediaone - in 2019 - Comments Off on Ek Nirnay – ( एक निर्णय )

वर्षाअखेरीस चांगल्या वाईट गोष्टींची गोळाबेरीज करताना नव्या वर्षात एक गोष्ट नव्याने जोडली जाते, ती म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प आणि निर्णय. आयुष्यातल्या एखाद्या महत्त्वाच्या वळणावर प्रत्येकाला स्वत:चा असा एक निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येकाचा हा निर्णय आयुष्याला वेगळं वळण देणारा असतो. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा ‘फक्त तुमच्या मनाचाच कौल ऐका’ असं सांगू पाहणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’  हा मराठी चित्रपट १८ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन, निर्मिती व दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली आहे.

आजची पिढी नेमकी कशी विचार करते? यावर कोणी फारसा विचार केलेला दिसत नाही. या पिढीला काय हवंय, त्यांचे विचार, त्यांचा जीवनाविषयी दृष्टिकोन कसा आहे? ते आपल्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतात? हे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून व त्यांनी घेतलेल्या निर्णयांतून दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. दोन पिढ्यांच्या विचारांमधील तफावतही यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखविण्यात आली आहे. हा विषय जरी आजच्या तरुणाईशी निगडित असला तरी घरातील प्रत्येकाचे दृष्टिकोन आणि विचार यामध्ये प्रतिबिंबीत झाले आहेत.

स्वरंग प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते,स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून कुंजीका काळवींट हा एक नवा गोड चेहरा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती स्वरात बांधली आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडें यांचे असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांचे असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. निहिरा जोशी देशपांडे, ऋषिकेश कामेरकर, जयदीप वैद्य, श्रुती आठवले, अंजली मराठे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.

माणसाची निर्णयक्षमता, त्याला अनुसरून त्याने स्वतःसाठी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयांचे होणारे दूरगामी परिणाम यावर ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट भाष्य करणार आहे.

येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.