Bhay – (भय)

Bhay – (भय)

Posted by mediaone - in 2018 - Comments Off on Bhay – (भय)

प्रत्येकाच्या मनात भीती दडलेली असते. यातील मानसिक भीती म्हणजे प्रत्यक्षात नसणारी पण क्षणोक्षणी आपला पाठलाग करणारी. मानसिक भीती आपल्या सावलीसारखी असते. नकारात्मक विचारसरणीतून निर्माण झालेली ही अवास्तव भीती आयुष्यात पावलोपावली अपयशाचा खड्डा खणत राहते. ही काल्पनिक भीती आपल्यावर स्वार होऊ द्यायची की नाही, हे आपल्याच मनी असतं. याच मानसिक भीतीवर भाष्य करणारा ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय’ हा चित्रपट २ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.

साप, विंचू, उंची, पाणी, बंदिस्त खोल्या, झोपेतली स्वप्नं, एवढंच काय, आपले नातेवाईक, आपला साहेब अशा अनंत बाबींची भीती एखाद्याला वाटत राहते. ही भीती काल्पनिक असली तरी, त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहिल्याने आपलं उर्वरित शरीर सुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येते. ही भीती भविष्याशीच निगडित असल्याने, काहीतरी अघटित घडणार असंच बरेचदा वाटत राहतं. हा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही तर काय  होऊ शकतो हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे … ‘भय’.

वेगळा विषय, खिळवून ठेवणारं कथानक यासोबतच ‘भय’ चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे दुबईच्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या यातील दोन गाण्यांद्वारे दुबईतील गगनचुंबी इमारती, अलिशान क्रुझ, हेलिपॅडवरील दृश्ये तसेच प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर घडते. अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर, धनंजय मांद्रेकर आदि कलाकारांचा अभिनय या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

शेखर अस्तित्व यांनी लिहिलेल्या तीन वेगवेगळ्या जॅानरच्या गीतांना विक्रम माँटोरोज याचं संगीत लाभले आहे. गायक तुलिका उपाध्याय, ब्रिजेश शांडिल्य, अली असलम यांच्या सुमधुर आवाजात ही गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. सहकारी निर्माते अनिल साबळे आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत. दमदार कथानक, श्रवणीय संगीत आणि त्याला कल्पक दिग्दर्शनाची जोड यामुळे भय हा चित्रपट रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.

२ मार्चला ‘भय’ प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.