आशाताई व साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी

आशाताई व साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी

Posted by mediaone - in Events - Comments Off on आशाताई व साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी

आपल्या मोहक सुरांच्या जादूने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले व साधना सरगम यांनी आगामी ‘हिरो’ या मराठी चित्रपटासाठी एक जुगलबंदी गायली असून या जुगलबंदीवर अभिनेत्री दिपाली सय्यद व शास्त्रीय नृत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे. एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित ‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.

‘धिनक धिन आग लगा दू मे’.. ‘गं बाई माझा तोरा नखरेल’..

असे बोल असलेल्या या गीताला ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी मखमली स्वरसाज दिला आहे. गीतकार असलम सयानी व कौस्तुभ पंत यांनी लिहिलेल्या या हिंदी-मराठी फ्युजन गीताला संगीताची साथ संगीतकार राजा अली यांनी दिली आहे तर नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केलं आहे. सवाल जवाबाची ही जुगलबंदी गाणं माझ्यासाठी स्पेशल असून ठेका धरायला लावणारी जुगलबंदी प्रेक्षकांनाही आवडेल असा विश्वास साधना सरगम यांनी व्यक्त केला.

दिपाली सय्यद यांना आजवर असंख्य गीतांवर नृत्य सादर करताना पाहिले आहे; परंतु ‘हिरो’ चित्रपटातील या गीताच्या निमित्ताने प्रथमच दिपाली व सुखदा यांची अफलातून अदाकारी एकत्रित पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अनिस मोराब सहनिर्मित ‘हिरो’ चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत

Comments are closed.