RAJA – (राजा)

RAJA – (राजा)

Posted by mediaone - in 2018, News - Comments Off on RAJA – (राजा)

आजकाल रुपेरी पडद्यावर मराठी चित्रपटांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय ‘राजा’चित्रपटातून  आपल्यासमोर येत आहे. आयुष्यात प्रत्येकजण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो.  वाटेत येणाऱ्या अडीअडचणींना पार करीत यशापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतो. याच धडपडीची कथा दाखवताना प्रेमाची गोष्ट उलगडणारा राजा हा संगीतमय चित्रपट २५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ चे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांचे आहे.

या चित्रपटाची कथा राजाच्या आयुष्यातील अनेक चढ–उतारांभोवती फिरते. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून राजाची कथा सादर केली आहे. सुपरस्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक ब-या वाईट प्रसंगांना सामोरं जाणाऱ्या राजाला कोणाची साथ मिळते? व या साथीने त्याचे स्वप्न पूर्ण होणार की त्याला वेगळीच कलाटणी मिळणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. राजाच्या संगीतमय प्रवासाची कथा हा चित्रपट मांडतो.

या चित्रपटाचे संगीत विविध संगीत शैलींचा अनोखा अनुभव  देणारा असणार आहे. वलय मुळगुंद, मिलिंद इनामदार, केदार नायगांवकर यांच्या लेखणीने सजलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे.  गावचा राजा, झन्नाटा, हंडीतला मेवा, जो बाळा जो जो रे,याद तुम्हारी आये, दगडाचे मन, हे मस्तीचे गाणे, आज सुरांना गहिवरले अशा वेगवेगळ्या जॉनरच्या आठ सुमधुर गाण्यांचा नजराणा यात आहे. सुखविंदर सिंग, शान, उदित नारायण या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ चौघुले, उर्मिला धनगर, सायली पडघन यांनी यातील गाणी गायली आहेत.

चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे या नव्या चेहऱ्यांसोबत शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन दामोदर नायडू याचं आहे. निर्मिती व्यवस्थापक पूनम घोरपडे तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आहेत. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून रंगभूषा शरद सावंत यांनी केली आहे.

प्रवीण काकड निर्मित आणि शशिकांत देशपांडे दिग्दर्शित संगीतमय चित्रपट राजा’ २५ मे ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Comments are closed.