लॉर्ड ऑफ शिंगणापूर – Lord of Shingnapur

लॉर्ड ऑफ शिंगणापूर – Lord of Shingnapur

Posted by mediaone - in 2016 - Comments Off on लॉर्ड ऑफ शिंगणापूर – Lord of Shingnapur

मराठी चित्रपटात भक्तीपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. धार्मिक विषयावरचे अनेक उत्तम सिनेमे मराठीत येऊन गेले आहेत. आता‘राठौड फिल्म्स प्रोडक्शनचा’  ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ हा धार्मिक सिनेमा प्रेक्षकांच्या रंजनासाठी सज्ज झाला आहे. राज राठैाड निर्मित व लिखित दिग्दर्शित ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ हा सशक्त कथानकाचा आणि वेगळ्या विषयांची मांडणी असलेला शनि महात्म्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणार आहे. ८ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘शनि देव’ हे शीघ्रकोपी अशी भक्तांची धारणा असते मात्र राज राठैाड यांनी शनि देवाचे एक वेगळं सकारात्मक रूप ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ च्या निमित्ताने भक्तांच्या समोर आणलं आहे. एखादयाच्या राशीत शनीची साडेसाती सुरु झाली म्हणजे काहीतरी विपरीत अथवा अघटित घडणार असा प्रत्येकाचा समज असतो. मात्र शनीच्या साडेसातीचा काळ जसा उतरती कळा दाखवतो तसाच तो आपल्याला बरंच काही शिकवत असतो. शनि देवाचं हे रूप भक्तांना आत्मविश्वास आणि सामर्थ्य देणार आहे. प्रेक्षकांना शनि महात्म्याबद्दल सांगताना नेहा आणि रोहितच्या भावस्पर्शी प्रेमकथेची किनार राज राठैाड यांनी चित्रपटासाठी कल्पकतेने वापरली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक एक वेगळा दृष्टीकोन घेऊन घरी जातील असा विश्वास निर्माते दिग्दर्शक राज राठैाड यांनी व्यक्त केला.

‘बाली उमर’, ‘निलांजन समाभास’, ‘देवा शनि देवा’, ‘ही दुनिया रे’, ‘तू माझी आशिकी’ ही पाच गाणी या चित्रपटात आहेत. फारुख बरेलवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, रूपकुमार राठैाड, साधना सरगम, जावेद अली, सुखविंदर सिंह,रवींद्र साठे, वैभव वशिष्ठ या दिग्गज गायकांचा स्वरसाज लाभला फरहान शेख यांनी ही गीते संगीतबद्ध केली असून पार्श्वसंगीत मोन्टी शर्मा यांचं आहे. चित्रपटाचे छायांकन प्रशांत जाधव याचं तर नृत्यदिग्दर्शन लोलीपॉप यांचं असून कलादिग्दर्शन प्रकाश पटेल आणि कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अजित देवळे यांनी सांभाळली आहे.

लॉर्ड ऑफ शिंगणापूर या चित्रपटात शनि देवाची भूमिका मिलिंद गुणाजी यांनी साकारली असून सुधीर दळवी, मनोज जोशी, वर्षा उसगांवकर, राहुल महाजन, आशुतोष कुलकर्णी, पंकज विष्णू, अनिकेत केळकर, मिलिंद जोशी, दीपक शर्मा, कांचन पगारे, वैभवी, ब्रजेश हिरजी, यशोधन राणा, यश चौहान, अॅड.वैभव बागडे, सागर पंचाल, शिशी गिरी, मनमौजी, आकाश भारद्वाज, अॅण्ड्रीया अशी कलाकारांची तगडी फैाज यात आहे.

२००३ साली सुरु झालेला राठैाड फिल्म्स प्रोडक्शनचा मनोरंजन क्षेत्रातला प्रवास हा दखल घेण्याजोगा आहे. राठैाड कॅसेट प्रा. लि च्या माध्यमातून ५०० हून अधिक भक्तीमय अल्बमची निर्मिती आजवर करण्यात आली असून त्यातल्या ‘ओम श्री साई सच्चरित’ अल्बमची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे.

‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ या चित्रपटाच खास आकर्षण म्हणजे हिंदीतील प्रख्यात गायक सुखविंदर सिंह यांनी  या चित्रपटातलं ‘देवा शनि देवा’ हे गीत गायलं असून ते सुखविंदर सिंह यांच्यावरच चित्रित करण्यात आलं आहे. हिंदीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर अभिनेता राहुल महाजन ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत पदार्पण करणार आहेत. ८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.