रवी काळे बनले घोडेस्वार

रवी काळे बनले घोडेस्वार

Posted by mediaone - in News - Comments Off on रवी काळे बनले घोडेस्वार

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांनी मराठी– हिंदीसह तामिळ, तेलगु चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. ‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांची एक वेगळीच भूमिका पहायला मिळणार आहे. माथेरान मध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणाऱ्या बाबू पवार या घोडेस्वाराची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. या भूमिकेसोबतच वडील आणि मुलीच्या नात्याचं हळवं रूपसुद्धा प्रेक्षकांना यात पहायला मिळणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वडिल आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत तिच्या अनोख्या मैत्रीचं स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतात, याचा संवेदनशील प्रवास या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रवी काळे सांगतात की, ‘आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी वेगळी इमेज आहे त्यापेक्षा या रोलमध्ये वेगळेपण होते म्हणून मी हा रोल स्वीकारला. शिस्तप्रिय, कठोर पण हळव्या आदर्श वडिलांची ही भूमिका प्रत्येक वडील स्वत:शी रीलेट करू शकतील’.

या चित्रपटाची खासियत म्हणजे माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करणारा व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट हा पहिलाच चित्रपट आहे. रवी काळे यांच्यासह नवोदित अभिनेत्री जानकी पाठक, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव, आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते डॉ. सुनील निचलानी असून निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीते लेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही गिरीश विश्वनाथ यांनी सांभाळली आहे. संकलन सागर भाटिया तर छायांकन सचिन खामकर यांचे आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांचे असून जावेद अली, उपग्ना पंड्या, ऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सहदिग्दर्शन निलेश देशपांडे यांचे आहे.

१६ नोव्हेंबरला ‘व्हॅनिलास्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Comments are closed.