युद्ध – एक अस्तित्वाची लढाई – Yudh

युद्ध – एक अस्तित्वाची लढाई – Yudh

Posted by mediaone - in 2015 - Comments Off on युद्ध – एक अस्तित्वाची लढाई – Yudh

समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. पण याची झळ जोपर्यंत आपल्यापर्यंत  पोहचत नाही तोपर्यंत सारं काही आलबेल असतं. अन्याय अत्याचाराचे बळी ठरल्यानंतर त्याविरूद्ध आवाज उठवण्याची धमकही फार कमी जण दाखवतात. ‘युद्ध’ एक अस्तित्वाची लढाई या आगामी चित्रपटातही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा लढा पहायला मिळणार आहे. समाजात घडणाऱ्या कलंकित घटनांचं प्रतिबिंब दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक राजीव रुईया यांनी केला आहे. येत्या १५ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

शेखर गिजरे निर्मित राजीव रुईया दिग्दर्शित ‘युद्ध एक अस्तित्वाची लढाई’ या चित्रपटातून स्त्रीच्या आत्मसन्मानाची गोष्ट मांडण्यात आली आहे. प्रतिष्ठीत लोकांचे बुरखे फाडून त्यांना समाजासमोर आणण्याची धाडस करणारी ही प्रेरक कथा आहे. माणसाच्या मनातल्या पशूवृत्तीचे दर्शन घडवतानाच अशा पशूवृत्तीला वेळीच ठेचायला हवं त्यासाठी समाजानेच पुढाकार घ्यायला हवा, हा संदेश या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. पत्रकार रागिणी देव, या सामान्य तरुणीची अन्यायामुळे झालेली होरपळ व तिला भोगाव्या लागलेल्या यातनाया चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या यातनांना सामोरं जात ती लढा उभारते, पण हा लढा लढताना तिला अनेक कटू प्रसंगांचा सामना करावा लागतो. तरीही निकराने लढा देण्याची तिची जिद्द, या जिद्दीलाउज्वल देसाई, इन्स्पेक्टर गुरु नायक आणि सारंगी देशमुख यांची मिळालेली साथ व त्यांनी एकत्रितपणे दिलेलाअन्यायाविरुद्धचा हा लढा आहे.

‘माय फ्रेंड गणेशा’ सारखा सुरेख हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या राजीव रुईया यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. ‘युद्ध’ एक अस्तित्वाची लढाई’हा सिनेमा सर्वसामान्य माणसाची होणारी ससेहोलपट, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा राग यावर भाष्य करतो. या चित्रपटातून अपप्रवृत्तीवर केलेली मात प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.

चित्रपटाची कथा शेखर गिजरे यांची आहे. अभिजीत गाडगीळ यांनी या सिनेमाचे लेखन केलं आहे, तर छायांकन सुरेश बिसावेनी व कला दिग्दर्शन सुरेश पिल्लई याचं आहे. चित्रपटातील गीते जाफर सागर यांनी शब्दबद्ध केली असून संगीताची जबाबदारी विवेक कार यांनी सांभाळली आहे. राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, पंकज विष्णू, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. श्रद्धा एंटरटेण्मेंटची निर्मिती असलेला  हा सिनेमा १५ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय.

Comments are closed.