बायकर्स अड्डा – Bikers Adda

बायकर्स अड्डा – Bikers Adda

Posted by mediaone - in 2015 - Comments Off on बायकर्स अड्डा – Bikers Adda

       वाऱ्यावर स्वार होत बाईक्स उडवणारी तरुणाई पाहताना काळजात धस्सं होतं. तारुण्याचा हा उत्साह आणि जल्लोष बायकिंगमध्ये एकवटलेला दिसतो. वेगाशी लावलेली ही झंझावती स्पर्धा केवळ मज्जा-मस्तीपुरती न उरता त्यातून सदुपयोगही साधता येऊ शकतो हे बहुतेकांना माहितच नसतं. अशाच काही वेगळ्या वाटा अवलंबणाऱ्या तरुणांचे भावविश्व उलगडणारा श्री. नवकार प्रस्तुत ‘बायकर्स अड्डा’ ९ ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

       विजय हरिया, प्रमोद मारुती लोखंडे निर्मित ‘बायकर्स अड्डा’ या नावावरून आपल्या लक्षात येतेच, हा चित्रपट बायकर्स आणि त्यांच्या सोकोल्ड गँगवर आधारित आहे. परंतु मॉडिफाई बाईक्स आणि त्यावर बसलेले सोकुल बायकर्स, त्यांचे फॅशनेबल जॅकेट्स, अंगावर गोंदवलेले निरनिराळे टॅटूज, डोळ्यात नेहमीचा जगजेत्ता असल्याचा माज ह्यापलीकडे जाऊन ‘बायकर्स अड्डा’ भाष्य करतो. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे त्यांची लाईफस्टाईल ही एक बाजू तर बाईकिंगचे वेड, ध्येय गाठण्याची चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, ग्रुप्समधले संघर्ष, येणाऱ्या अडचणी, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी, शह-मात ही दुसरी बाजू. बायकिंगचा एक वेगळा सकारात्मक दृष्टीकोन लेखक-दिग्दर्शक राजेश लाटकर यांनी आपल्या या चित्रपटातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

       ‘बायकर्स अड्डा’ मध्ये संतोष जुवेकर, प्रार्थना बेहेरे आणि श्रीकांत मोघेंसोबत नवतरूण बायकर्सनाही संधी देण्यात आली आहे. श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे, हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, देवेंद्र भगत , तन्वी किशोर आणि निखिल राजेशिर्के आदींच्या प्रमुख भूमिका आणि अचंबित करणारे स्टन्टस पाहण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. शिवाय या चित्रपटाद्वारे बायकिंग हा खेळ नसून ते एक प्रकारचे पॅशन आहे. रस्त्यावर सर्रास केले जाणारे स्टंटस हे प्राणघातक ठरू शकतात याची जाणीव खऱ्या बायकर्सना असते हे त्यांनी आपल्या ‘बायकर्स अड्डा’ या चित्रपटाद्वारे दाखवून दिले आहेत. नशेत धुंद असणारे अशा काहीशा नजरेने पाहिल्या जाणारया बायकर्सकडे या चित्रपटामुळे प्रेक्षकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

       ‘लेक्चर ग्यान’, ‘आला रे आला बाप्पा तू आला’, ‘ट्युन टू लव्ह’, ‘रिमझिम’, ‘वल्लाह वल्लाह’ अशी वेगवेळ्या मूडची हटके गाणी ‘बायकर्स अड्डा’ मध्ये ऐकायला मिळणार आहेत. सत्यजित रानडे, प्रशांत हळवे, श्रेयस धर्माधिकारी आणि अमित जॉन लिखित गीतांना जसराजजोशी, शाल्मली खोलगडे, श्रेयस धर्माधिकारी, प्रियांका बर्वे, शोना गोन्साल्विस आणि सिद्धांत भोसले या युवा गायकांचा सुरेल स्वर लाभला आहे. मेहुल कपाडिया, जीत सिंग आणि संतोष पालवणकर यांनी ही गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

       मन्सूर आझमी यांचे वेगवान संकलन आणि शकील खान यांच्या छायांकनाने ‘बायकर्स अड्डा’ चे सेट्स, लोकेशन्सना योग्य न्याय दिला आहे. कला दिग्दर्शन आणि कार्यकारी निर्मात्याची जबादारी अतुल तारकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा – चैत्राली डोंगरे, साहसदृश्य – प्रशांत नाईक आणि मेकअप – किरण सावंत ही इतर श्रेयनामावली आहे.

 

 

Comments are closed.