पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर

पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर

Posted by mediaone - in Events - Comments Off on पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर

गानसरस्वती कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा गानसरस्वती पुरस्कार मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे आद्य शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील वर्षापासून सुरु केला आहे.

भारतीय शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात यश मिळवलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या कलाकारास हा गानसरस्वती पुरस्कार दिला जातो. १ लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१७ साली पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना प्रदान करण्यात आला होता.

पं. संजीव अभ्यंकर हे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत. गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याबरोबर त्यांनी ‘जसरंगी’ नामक जुगलबंदीचा अभिनव कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केला आहे.

या पुरस्काराबाबत पं. संजीव अभ्यंकर म्हणाले, हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद मला झाला आहे. या पुरस्कारच्या रूपाने किशोरी ताईंचा आशीर्वाद मला मिळाला असल्याचं मी समजतो. मुंबई येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात पं. संजीव अभ्यंकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Comments are closed.