‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात  ‘डॉटर’ लघुपटाची बाजी

‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात  ‘डॉटर’ लघुपटाची बाजी

Posted by mediaone - in Blog, Events, News - Comments Off on ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात  ‘डॉटर’ लघुपटाची बाजी

पंधराव्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाने भारतातीलच नव्हे तर आशियाई देशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या पंधराव्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात ६० हून अधिक वैविध्यपूर्ण चित्रपटांची व लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. महोत्सवाचा समारोप दिग्दर्शक सुमित्रा भावे व सुनील सुखथनकर यांच्या कासव या मराठी चित्रपटाने झाला.

याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते फिल्म सोसायटी चळवळीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुण्याच्या ‘आशय फिल्म क्लबचे’ संस्थापक सतीश जकातदार यांना यंदाच्या ‘सत्यजित रे स्मृती’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘इंडियाज फिल्म सोसायटी मुव्हमेंट’ द जर्नी अॅण्ड इट्स इमपॅक्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ या वेबसाईटचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले.

या पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच आशय फिल्मच्या स्थापनेमागची प्रेरणा तसेच या प्रवासात त्यांना मिळालेला कुटुंबाच्या व मित्रमंडळींच्या पाठिंब्याबद्दल सतीश जकातदार यांनी आभार व्यक्त केले. प्रभात चित्रमंडळ तसेच फिल्म सोसायटी चळवळीच्या कार्याच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी गौरवोद्द्गार काढत फिल्म चळवळीचा पट उलगडला. महोत्सवांबद्दलचा आढावा हल्ली माध्यमातून हवा तसा घेतला जात नसल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत महोत्सवांची माहिती पोहचत नसल्याची खंत ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर यांनी यावेळी बोलून दाखविली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,  चित्रपट महोत्सवांना सहाय्य करणार असून अशाप्रकारच्या महोत्सवांचे अधिकाअधिक आयोजन व्हावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी यावेळी केले.

यंदाच्या लघुपट स्पर्धा विभागात नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या नव्या पद्धतीची मांडणी करणारे लघुपट रसिकांना पहायला मिळाले. इराणचा ‘डॉटर’ हा लघुपट यंदाचा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला असून स्पेशल ज्युरी अॅवॅार्ड बांगलादेशच्या ‘स्टेटमेंट आफ्टर माय पोएट हसबण्ड डेथ’ तसेच भारताच्या ‘इयत्ता’ या चित्रपटाला मिळाला. नव्या गुणवंत दिग्दर्शकांनी बनवलेल्या लघुपटांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या या लघुपट स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. १५ ते २२ डिसेंबर दरम्यान रंगलेल्या या महोत्सवाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला.

Comments are closed.