कॅरी ऑन देशपांडे – Carry on Despande

कॅरी ऑन देशपांडे – Carry on Despande

Posted by mediaone - in 2015 - Comments Off on कॅरी ऑन देशपांडे – Carry on Despande
          मराठी रुपेरी पडदयावर मनोरंजक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात एका वेगळ्या विषयावरचा आणि रसिकांचे मनोरंजन करणारा नर्म विनोदी ढंगाचा ‘कॅरी ऑन देशपांडे’ हा आगामी मनोरंजक चित्रपट येत्या ११ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अथर्व 4 यु रिकिएशन अँड मिडिया प्रा लि. प्रस्तुत, गणेश रामदास हजारे निर्मित आणि विजय पाटकर दिग्दर्शित या चित्रपटात विनोदवीरांच्या धमाल किस्स्यांची मेजवानी रसिकांना घेता येईल.
         तीन बायकांच्या गोंधळात अडकलेल्या देशपांडे नामक पुरुषाची कर्मकहाणी या सिनेमातनं विनोदी पद्धतीने मांडली आहे. तीन बायकांच्या तावडीत सापडलेला एकुलता-एक बिचारा नवरा आणि त्याची झालेली फसगत या विनोदी कथानकाभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली असून ही खुमासदार कथा हेमंत एदलाबादकर यांनी लिहिली आहे.
          विजय पाटकर अभिनित आणि दिग्दर्शित कॅरी ऑन देशपांडेया चित्रपटात पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, मानसी नाईक, हेमलता बाणे, सागर कारंडे, जयवंत वाडकर, विजय कदम, सविता मालपेकर यांसारख्या कसलेल्या कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पहायाला मिळेल. खुमासदार कथा असणाऱ्या या चित्रपटाची गीतेही तितक्याच रंजकतेने सादर केली आहेत. मंगेश कंगणेंनी लिहिलेल्या गीतांना शाल्मली खोलगडे, हृषिकेश कामेरकर, सावनी रवींद्र, किर्ती किल्लेदार यांनी स्वरसाज चढवला आहे. या गीतांना चिनार-महेश आणि निखिल ठक्कर यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची शब्बीर नाईक तर संकलनाची जबाबदारी सतीश पाटील यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन उज्वल जगताप याचं आहे. तर नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार यांचं आहे. 
           खुमासदार कथानक, विजय पाटकरांचं भन्नाट दिग्दर्शन, विनोदवीरांची रंगलेली जुगलबंदी या जमलेल्या त्रिसूत्रीने कॅरी ऑन देशपांडे हा चित्रपट प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. ११ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.