KAY ZALA KALANA – (काय झालं कळंना)

KAY ZALA KALANA – (काय झालं कळंना)

Posted by mediaone - in 2018, News - Comments Off on KAY ZALA KALANA – (काय झालं कळंना)

प्रेम.. ही सुंदर भावना.

कुणाला कळलेली, कुणाला न कळलेली.

 

काहींना अलगद सहजपणे स्वर्गसुख देणारी. तर काहींसाठी विरह आणि वेदना देणारी. पहिल्या प्रेमाची तर बातच न्यारी… प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणारा काय झालं कळंना हा  प्रेमपट येत्या २० जुलैला  प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन’ ची प्रस्तुती असलेल्या काय झालं कळंना या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे.

 

कुणाचं प्रेम अनंत अडचणीतून यशस्वी होतं, तर कुणाला प्रेम मिळतच नाही.  प्रेम’ हा मध्यबिंदू ठेवून शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा या चित्रपटातून मांडली आहे. प्रेमासाठी त्याग, संघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या शरद आणि पल्लवी यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेत?  हे वळण त्यांना एकत्र  आणणार  की वेगळं करणार ?  हे दाखवतानाच जगण्याचा नवा अर्थ उलगडून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.  या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका आहेत.

प्रेमकथेला कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.

काय झालं कळंना  हा मराठी चित्रपट २० जुलैला  प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.