एक तारा – Ek Taraa

एक तारा – Ek Taraa

Posted by - in 2015 - No Comments

कानांना तृप्त करणारं, मनाला भिडणारं, आत्म्याशी हितगुज करणारं संगीत.. संगीत ही अशी कला आहे ज्यात गाणारा आणि ऐकणारा दोघेही एकाचवेळी स्वर्गीय आनंदानुभव घेतात. गीत, संगीत आणि गायकी यांच्या सुरेल मिलाफाचा आविष्कार नवनव्या तऱ्हेने सादर केले जाऊ लागलेत. अविश्रांत केलेली कलेची साधना, खडतर प्रवासाची वाट, प्राप्त सिद्धीसाठी केलेली धडपड आणि आपलं अढळ स्थान टिकवताना होणारी होरपळ.. ही साधारण सर्वच क्षेत्रातील कलावंतांची हकीकत. अशाच एका ताऱ्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर येणार आहे. रईस लष्करिया निर्मित आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित महत्वाकांक्षी संगीतमय चित्रपट ‘एक तारा’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

 रिअलिटी शोज् मधून पुढे येणारा एक कलाकार आपल्या कलागुणांच्या होणार्या कौतुकाने कसा हरखून जातो. मिळालेली प्रसिद्धी, वैभव आणि मुळात नावलौकिकाकडे कसा पाहतो, त्याला येणारे अनुभव त्यातून स्वतःला नक्की काय मिळालं-काय गमावलं या साऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा करताना दिसेल. प्रसिद्धी मिळवणं आणि टिकवणं यामधली मनाची घालमेल वाढवणारी तारेवरची कसरत करताना आपण खरंच काही मिळालं का.. याचा उहापोह ‘एक तारा’ करतो.

 संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडित, उर्मिला निंबाळकर, सागर करंडे, सुनील तावडे, मंगेश देसाई आणि चैतन्य चंद्रात्रे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक तारा’ ची कथा लिहिली आहे अवधूत गुप्ते, सचिन दरेकर यांनी तर पटकथा-संवाद सचिन दरेकर यांचे आहेत.  सादिक लष्करीया, विशाल घाग सहनिर्मित विशाल देवरुखकर यांचे सहदिग्दर्शन लाभलेल्या ‘एक तारा’चं छायांकन  अमलेंदू चौधरी यांचे असून शैलेश महाडिक कला दिग्दर्शक आहेत. संकलक इम्रान महाडिक, फैझल महाडिक तर वेशभूषा अश्विनी कोचरेकर यांनी केली आहे.

 ‘एक तारा’ हा संगीतप्रधान चित्रपट असल्यामुळे यातील गाण्यांची गंमतच न्यारी आहे. तब्बल १३ गाण्यांचा रसास्वाद ‘एक तारा’मधून रसिकप्रेक्षकांना घेता येणार आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी ‘एक तारा’ साठी लिहिलेली वेगवेगळ्या बाजाच्या गीतांना अवधूत गुप्तेंनी स्वरसाज चढवून न्याय दिलाय. तरुणांच्या आवडी-निवडी जपत.. बोली शब्दांची योग्य सांगड घालत, ओठी रुळणारी ‘जिंदगी हे झाड’, ‘ठोक साला’, ‘विसर तू (रॉक)’, ‘हर काश में’, ही वेड लावणारी गुरु ठाकूरची गीते तर अवधूत गुप्तेंच्या लेखणीतून ‘येड लागलं’, ‘देवा तुझ्या नावाचं येड लागलं’, ही दोन भक्तिमय गीतं खरोखरीच उत्तमरीत्या सांधली गेलीयेत. तसेच ‘वाली तू लेकरांचा’, ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘चालते नाणे’ आणि ‘अर्ध्या हळकुंडानं’ हे मॉडन भारुडही खासचं जमून आलंय. चित्रपटातील गाण्यांच्या बाजाप्रमाणे सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम, विदित पाटणकर, मुग्धा कऱ्हाडे आणि अवधूत गुप्ते या कसलेल्या गायकांकडून त्यांच्या सुरेल स्वरात गाऊन घेतली आहेत. तसेच अवधूत गुप्तेंच्या मैत्रीखातर दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि साउंड रेकॉर्डीस्ट अवधूत वाडकर यांनीही आपल्या आवाजाची कमाल दाखवली आहे.

Ek Taraa – Premier in Mumbai

Post a Comment